राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर.

मुंबई मनपा कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर, ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये बोनस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी घोषणा..
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे.
यानुसार मुंबई महानगरपालिकेतील..
१. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/-
२. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये ३१,०००/-
३. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये ३१,०००/-
४. माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
५. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
६. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
७. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
८. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १४,०००/-
९. बालवाडी शिक्षिका / मदतनीस - भाऊबीज भेट रुपये ०५,०००/-
यांना यानुसार सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
*ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये बोनस*
याशिवाय एमएमआर क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ ठाणे महापालिकेच्या ९ हजार २२१ कर्मचाऱ्याना होणार आहे. गेल्यावर्षी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त २४ हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी सन २०२५ साठी २४ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
यात,
* ठाणे महापालिकेचे ६०५९ कर्मचारी,
* शिक्षण विभागाचे ७७४ कर्मचारी,
* परिवहन विभागाचे १४०० कायम कर्मचारी,
* महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी
* इतर ९८८ कर्मचारी यांना हे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
*नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये बोनस*
तर नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
* यात नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना 34 हजार 500/- इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
* ठोक मानधनावर, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी - कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना रू. 28,500/- इतकी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाणार आहे.
* सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे रू. 28,500/- इतके सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
* त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना रू. 18,500/- इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
* यावर्षी आरोग्य विभागातील कोविड, नॉन कोविड अंतर्गत कार्यरत अधिकारी – कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील घड्याळी तासिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कर्मचारी आणि अंशकालीन निदेशक (कला, क्रीडा व कार्यानुभव) यांनाही रू. 18,500/- सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे यंदा या तीन महानगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सबंधित महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिले आहेत. तसेच या सर्व महानगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या

संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची राबोडी पोलीस ठाण्यावर धडक.


.jpeg?token=eyJraWQiOiJzdG9yYWdlLXVybC1zaWduaW5nLWtleV80OWRlYzg4MC1hYjhhLTQyMmEtYWNlZS1lMmNhMjhlMGM0MTciLCJhbGciOiJIUzI1NiJ9.eyJ1cmwiOiJpbWFnZXMvSU1HXzkzOTUgKDEpLmpwZWciLCJpYXQiOjE3NjEzMTg2NDQsImV4cCI6MTc5Mjg1NDY0NH0.osE1X3LOPOP5TJfidIN4q64ugi3DkFDipbuqPE3M6qY)