श्रावणी कोंडविलकरला आंतरराष्ट्रीय रौप्य पदकाची कमान.

महाडच्या चॅम्पियन्स कराटे क्लबच्या श्रावणी कोंडविलकरने श्रीलंकेत झालेल्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना रौप्य पदक पटकावले.
महाडच्या चॅम्पियन्स कराटे क्लबच्या श्रावणी कोंडविलकरने श्रीलंकेत झालेल्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना रौप्य पदक पटकावले. तिच्या या कामगिरीने रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
श्रीलंका देशातील कोलंबो स्टेडियमवर कॅडेट ज्युनिअर अंडर २१ सिनियर साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिप २०२५ आतंरराष्ट्रीय कराटे स्पर्धा खेळवण्यात आल्या, यावेळेस जगातील ६ देश सहभागी झाले होते. ज्यामध्ये भारत, श्रीलंका, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांचा समावेश होता. या स्पर्धेत २५० कराटे स्पर्धक सहभागी झाले होते.अंतिम फेरीत श्रीलंका आणि भारत अशी लढाईत श्रावणीने आपल्या उत्कृष्ट कौशल्याने व दमदार कामगिरीने स्पर्धेतील प्रतिस्पर्ध्यावर मात करत सामन्यात घवघवीत यश संपादन केले.
श्रावणी कोंडविलकर सध्या " कोकण एज्युकेशन सोसायटी कै.सौ. पार्वतीबाई महादेव थरवळ कन्या विद्यालय " महाड रायगड येथे सेमी इंग्लिश माध्यमातून नववी मध्ये शिक्षण घेत आहे. यादरम्यान तिला स्पर्धात्मक कराटे खेळण्यासाठी शाळा समितीकडून सहकार्य मिळत आहे. श्रावणीचे मूळगाव महाड तालुक्यातील आंबिवली रोहिदासवाडी येथील शेतकरी कुटुंबात श्रावणीचा जन्म झाला आहे. वडील तुकाराम कोंडविलकर कोकण रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, आई तनुजा गृहिणी असली, तरी तिने या खेळासाठी मला खूप प्रोत्साहन दिले आहे. माझा आहार, स्पर्धेचे नियोजन, शाळेचा अभ्यास यामध्ये आईचे अमूल्य योगदान आहे. मोठी बहीण जागृती कोंडविलकर सिविल इंजिनीअरिंग पदवी प्राप्त केले, तर दुसरी बहीण सेजल हिने हॉटेल मॅनेजमेंट केले असून त्याच्याकडूनही नेहमीच मार्गदर्शन मिळत असल्याचे श्रावणीने सांगितले.
लहानपणीच माझे वडील तुकाराम कोंडविलकर यांनी कराटे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरले, कराटे हे स्वसंरक्षणाचे एक प्रभावी तंत्र आहे, ज्यामुळे स्वतःचे रक्षण करता येते, स्वतःच संरक्षण सोबत इतरांचे संरक्षण करण्यासाठी हातभार लागेल.यांचाही विचार करत वयाच्या ७ व्या वर्षी महाड येथील चॅम्पियन्स कराटे क्लब येथे प्रवेश घेत, या बाबत प्रशिक्षण घेत मेहनत घेत स्वतःला कराटे सर्धेत झोकून दिले आहे. मागील काही दिवसांपासून तिची यशस्वी कामगिरी पाहून चॅम्पियन्स कराटे क्लबचे प्रशिक्षक प्रसाद सावंत यांनी जबाबदारी म्हणून श्रावणीला कराटे खेळाडूंना तुम्ही प्रशिक्षण द्यावे असेही म्हटले, मुख्य प्रशिक्षक प्रसाद सावंत हे गेले काही वर्ष महाड तालुक्यातील विद्यार्थ्यांंना शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊन याचे खास प्रशिक्षण देत आहेत व यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले आहेत. सावंत सरांचे सतत मार्गदर्शन मिळत असते असे श्रावणीने सांगितले.
श्रावणीने आपल्या शिस्तबद्धतेने, कठोर परिश्रमांनी आणि कौशल्यांच्या जोरावर कराटे या खेळात विविध स्पर्धेमध्ये श्रावणीने यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय एशियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक मिळविले असून, राज्यपातळीवर मुंबई, ठाणे, डोंबिवली, पुणे, सातारा, बारामती, उत्तराखंड, महाड अशा विभागीय स्तरावर एकूण सुवर्ण पदक ४० तर ८ रौप्य पदकांची कमाई केली. अवघ्या १४ वर्षांच्या वयात एकूण ४८ पदके प्राप्त करून यश मिळवणे अतुलनीय आहे. हे यश तिच्या मेहनतीसोबतच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचेही फळ आहे.
श्रावणी पालकांनी तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले श्रावणीने लहान वयात मोठी कामगिरी करून आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट निर्माण केली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्हीं नेहमी तिच्या पाठीशी उभे राहू.
शेतकरी कुटुंबातील श्रावणी कोंडविलकर परत येताच कोंडविलकर कुटुंबाने स्वागत केले.तिच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे आंबिवली रोहिदासवाडी ग्रामस्थ महिला पंचक्रोशीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यभरातून श्रावणीचे अभिनंदन होत आहे.श्रावणीचे हे यश भारतातील कराटेच्या विकासासाठीही सकारात्मक ठरेल. तिच्या यशाबद्दल संपूर्ण कराटे समुदायाने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
कोट :
‘मला असे वाटते की, विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर केले पाहिजे आणि जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करून भारताचे नाव मोठे केले पाहिजे, भविष्यात प्रशिक्षिका म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, त्यासाठी मेहनत घेईन.’ - श्रावणी कोंडविलकर, रौप्य पदक विजेती
‘श्रावणीचे यश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. तीने दाखवलेले कौशल्य आणि मेहनत हे देशातील इतर खेळाडूंनाही प्रोस्ताहन देतील.’ - प्रसाद सावंत, मुख्य प्रशिक्षक, चॅम्पियन्स कराटे क्लब महाड
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या



