कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळून दुर्घटना; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू..

कोपरखैरणे सेक्टर 2 परिसरात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक दुर्घटना घडली. सेक्टर 2, प्लॉट क्रमांक 12 येथे असलेल्या विद्या भवन सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने तळमजल्यावर सुरू असलेल्या घरगुती क्लासमध्ये मोठी दुर्घटना घडली.
या घटनेत 14 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 12 विद्यार्थी आणि एका शिक्षिकेची अग्निशमन दलाने यशस्वी सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावर विद्यार्थ्यांचा क्लास सुरू होता. त्याच वेळी वरच्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला. स्लॅबचा मोठा भाग खाली पडल्याने क्लासरूममध्ये उपस्थित असलेले विद्यार्थी आणि शिक्षिका मलब्याखाली अडकले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन राबवून एकूण 12 विद्यार्थी आणि 1 शिक्षिका अशा 13 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
बचाव करण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यापैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या मनीष मसे (वय 14) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वाशी येथील मनपा रुग्णालय प्रशासनाने दिली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.
दरम्यान, स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून इमारतीच्या संरचनेची तपासणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. इमारत जुनी असल्यामुळे किंवा बांधकामातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करत असून पुढील तपास सुरू आहे.
रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
सिद्धांत गुप्ता (वय 8), प्रिन्स सोनी (वय 11), आयशा, कुसुम (वय 15), निष्का धनवाडे (वय 14), मनीष मसे (वय 14), आराध्या बोडसे (वय 14), तन्वी श्रीवास्तव (वय 7), देवांश पुजारी (वय 12), राजदीप वानखेडे (वय 10), पार्थ खैरनार (वय 14), रुद्र येलूरकर (वय 5) तसेच शिक्षिका शामली चौधरी (वय 53).
या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी इमारतींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी जुनी व धोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या

खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन.


