ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडून देण्यासाठी प्रयत्न करणार - विकास रेपाळे

ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्ता असूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना संधी मिळत नव्हती, ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित ॲपेक्स कॉन्सील सदस्य विकास रेपाळे यांनी सांगितले.
एमसीएच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विकास रेपाळे यांनी १९५ मत मिळवून पहिल्यांदाच मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीत प्रवेश केला आहे.
आपल्या निवडीबद्दल रेपाळे म्हणाले, शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक वर्ष सामाजिक, राजकीय आणि क्रिडा क्षेत्रात काम करत आहे. मागील अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटू मर्यादित सोयीसुविधा असताना मुंबईतील मैदान क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत आहेत. या आणि अन्य क्रिकेटपटूंना सर्व सोयी सुविधांनी युक्त एमसीएची केंद्र ठाण्यात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय ठाणेकरांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपटूंचा खेळ जवळून पाहता यावा याकरता दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहात विविध सामन्यांचे आयोजन करण्यात येईल.
विकास रेपाळे यांनी यापूर्वी ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. याशिवाय महाराष्ट्र माझा सेवा संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ठाणे प्रीमिअर लीग टी - २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहेत. या स्पर्धेमुळे ठाण्यातील अनेक युवा क्रिकेटपटूंना अनेक राष्ट्रीय पातळीवर, आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या क्रिकेटपटू सोबत खेळण्याची संधी मिळत आहे. तसेच अनेक होतकरू खेळाडूंना नेहमीच ते मदतीचा हात देत आहेत. विकास रेपाळे यांच्या सारखा क्रिडापटू असलेला चेहरा आज ठाण्याचे प्रतिनिधीत्व एमसीए मध्ये करणार असल्याने ठाणेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या



