ठाण्यात महाशक्तीप्रवेश! ‘शिवसेनेचा भगवा प्रत्येक नगरपालिकेवर फडकणार!’

*राज्यातील १६ विभागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, स्पीड ब्रेकर सरकार गेलं, विकासाचं इंजिन वेगात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना जोरदार टोला
ठाण्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध १६ भागांतून आलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत सांगितले की, “आजच्या प्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. शिवसेनेचा भगवा प्रत्येक नगरपालिकेवर फडकणार,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
गेल्या अडीच-तीन वर्षांपासून राज्यभर प्रवेशाची रीघ लागलेली आहे. लोक विश्वासाने आमच्यासोबत येत आहेत, कारण आम्ही विकास आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आहोत.
“महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासाच्या वाटेवर स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या सर्व अडथळ्यांना दूर करून विकासाला गती दिली,” असे शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जनतेच्या मनात घर करून बसली आहे. ‘लेक लाडकी लखपती’ योजना, विविध कल्याणकारी योजना या सगळ्यांतून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम केलं आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, प्रिंटिंग मिस्टेकच्या सबबी देत नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
“राज्यातील शेतकरी बांधव ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसामुळे संकटात आहेत. पण आपलं सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं हे आमचं कर्तव्य आहे,” असा विश्वास शिंदे यांनी दिला.
मुंबईतील विकासकामांबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रोची थांबलेली कामं, सर्व रस्ते कॉंक्रिटचे करण्याचं काम हे सर्व आम्ही मार्गी लावलं आहे. आता मुंबईत खड्डा शोधून मिळणार नाही!”
त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे दवाखाने, सुशोभीकरण प्रकल्प आणि नागरिकाभिमुख योजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी पुढील निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांना हाक दिली. “नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे.
“विरोधकांकडे आता मुद्दे नाहीत. ते खोटेनाटे आरोप करतात. पण मी आरोपांना उत्तर देणार नाही. माझं उत्तर म्हणजे माझं काम आहे,” असं शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
ते म्हणाले, “शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. जो काम करेल, तो पुढे जाईल. मी स्वतः कार्यकर्ता होतो, आहे आणि राहणार आहे.”
भविष्यातील कामकाजाबाबत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हटलं,
“लोकांच्या समस्या सोडवा. अन्याय कुठे होत असेल तर तो सहन करायचा नाही. तुमच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. ज्या विश्वासाने तुम्ही आलेले आहात, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”
कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत सांगितले,
“विकास, विश्वास आणि बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी शिवसेना, हीच खरी जनतेची शिवसेना आहे!”
याप्रसंगी उबाठा सचिव तथा प्रवक्ता डॉक्टर संजय लाखे पाटील, धुळे येथील उबाठा नगरसेवक जितेंद्र जगताप, शहर संघटक विनोद जगताप, धुळ्याचे माजी सभापती वसंत पावरा, मनसे माथाडी उपाध्यक्ष प्रथमेश चव्हाण, अमित जंगम ( रायगड ), गोपीनाथ संसारे, मातंग समाज मुंबई अध्यक्ष विकी जाधव, शमशुद्दीन शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या



