निकालानंतर मुंबईत राजकीय खळबळ; शिंदेसेनेचे नगरसेवक फाईव्ह स्टार हॉटेलात? फोडाफोडीची भीती वाढली

महापालिका निकालानंतर मुंबईच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून महापालिकेतील सत्तासमीकरणांवर सध्या सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होण्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी निर्णय घेतला आहे. शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या असून ‘फोडाफोडीची भीती’ हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेने २९ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या असल्या, तरीही ११४ च्या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अत्यावश्यक ठरतो. त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीत शिंदेसेनेची भूमिका निर्णायक बनली आहे. शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणे शक्य नाही. परिणामी, सत्तेची चावी शिंदेसेनेच्या हातात असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून कोणतीही जोखीम न पत्करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जोपर्यंत महापालिकेत अधिकृतपणे सत्ता स्थापनेचा दावा केला जात नाही, तोपर्यंत सर्व नगरसेवक एकजूट राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे शिंदेसेनेचे मत आहे. त्यामुळेच नवनिर्वाचित नगरसेवकांना एकाच ठिकाणी, सुरक्षित वातावरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजकीय इतिहास पाहता, सत्ता स्थापनेच्या काळात नगरसेवक, आमदार फोडण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाले आहेत. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या राजकीय डावपेचांचा वापर केला जातो. विरोधक किंवा अन्य पक्षांकडून शिंदेसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी भीती शिंदेसेनेला वाटत आहे. अशा प्रकारची फोडाफोडी झाली, तर संपूर्ण सत्तासमीकरण कोलमडू शकते आणि महायुतीचे गणित बिघडू शकते.
दुसरीकडे, विरोधी पक्षांची आकडेमोडही महत्त्वाची ठरते. ठाकरे बंधूंचा गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रित आकडा सुमारे ७२ जागांपर्यंत जातो. काँग्रेसने २४ जागा जिंकल्या असून, या तिन्ही पक्षांचा मिळून आकडा ९६ वर पोहोचतो. काही अपक्ष किंवा विचारधारेशी जवळीक असलेले पक्ष एकत्र आल्यास हा आकडा बहुमताच्या अगदी जवळ पोहोचू शकतो. त्यामुळेच प्रत्येक नगरसेवक महत्त्वाचा ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचा प्रत्येक नगरसेवक ‘सोन्याच्या भावाचा’ मानला जात असून त्यांना एकत्र ठेवण्यासाठी पंचतारांकित हॉटेलचा पर्याय निवडण्यात आला आहे. हा निर्णय केवळ सुरक्षेच्या दृष्टीने नाही, तर राजकीय स्थैर्य राखण्यासाठीही महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची असेल, याचा फैसला होणार असून तोपर्यंत राजकीय हालचाली, भेटीगाठी आणि रणनीती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या



