जागतिक जंप रोप चॅम्पियनशिप, रोनक दिपक साळवे रौप्य पदकांचा मानकरी.

महाडचा रोनक साळवे यांचे जागतिक जंप रोप क्षेत्रात गगन भरारी, उत्तुंग यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव ..
जपानच्या कावासाकी शहरात नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक जंप रोप (दोरी उड्या) चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत महाड तालुक्यातील कुंबळे गावचा 16 वर्षीय तरुण रोनक दिपक साळवे याने चमकदार कामगिरी करून दाखविली आहे.
आयजेआरयूने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जगभरातून 36 देशातील 2600 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत रोनक दिपक साळवे याने रौप्य पदक प्राप्त करून देशाची मान उंचावली आहे.
त्याच्या या यशाबद्दल कळताच उत्तुंग कामगिरी करीता त्याचे आई ,भाऊ , ग्रामस्थ, शिक्षक, मित्र परिवार, समाज बांधव, बौद्धविकास मंडळ व रमाई महिला मंडळ स्थानिक मुंबई कुंबळे यांनीही त्यांच्या मूळगावी सत्कार करून रोनक च्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रोनक डोंबिवली येथील रहिवासी असून मूळचा महाड तालुक्यातील कुंबळे या गावचा आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच इयत्ता नववी पासूनच त्याच्या मनात जंप रोप खेळाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने सराव करत बुलढाणा येथे राज्यपातळीवरील स्पर्धेत सहभाग घेतला.
रोनक दिपक साळवे सध्या प्रगती कॉलेज ऑफ कॉमर्स डोंबिवली येथे 12 वी मध्ये शिक्षण घेत आहे. यादरम्यान जपानच्या कावासाकी जंप रोप स्पर्धेसाठी सहभागी होणार असल्याची माहिती मिळताच, प्रगती कॉलेजचे चेअरमन जगन्नाथ पाटील आणि व्यवस्थापक, शिक्षक, कर्मचारी यांनी पुढाकार घेत सढळ हस्ते आर्थिक हातभार लावला.
या खेळात विविध स्पर्धेमध्ये त्याने यश संपादन केले आहे. जागतिक जंप रोप चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत रौप्य पदक मिळविले असून, राष्ट्रीय पातळीवर सात सुवर्ण व दोन रौप्य पदक, राज्यपातळीवर चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदक तसेच मुंबई विभागीय स्तरावर एक सुवर्ण पदक संपादन केले आहे. आत्तापर्यंत रोनक ने एकूण वीस पदके मिळविली असून, सराव स्पर्धेत 30 सेकंदात 100 जंप रोप मारण्याची अद्भुत किमयाही त्याने साधली आहे. रोनकने डबल अंडर " म्हणजे एकाच उडीमध्ये रस्सी दोनदा पायाखाली फिरवणे "दुहेरी उडी" या खेळात 30 सेकंदात 97 जंप मारण्याचा विक्रमही स्वतःच्या नावे केला.
याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना रोनक म्हणाला, माझे वडील दिवंगत डॉ. दिपक महादेव साळवे हे संत गाडगे महाराज कॉलेज, मुंबई येथे उपप्राचार्य या पदावर कार्यरत होते. आई गृहिणी असून आई-वडील हेच माझे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत. वडिलांनी स्वतःचे शिक्षण आणि नोकरी मेहनतीने मिळविली. त्यांनी दोन विषयांमध्ये पीएचडी मिळविली. तसेच ते मुंबई विद्यापीठात रिसर्च गाईड ही होते. वडीलांची शिकवण होती की आपण जर मनापासून प्रयत्न केले तर आपण हवं ते यश प्राप्त करू शकतो.यशस्वी होण्यासाठी मेहनत करणे हा एकमेव पर्याय आहे.आई गृहिणी असली तरी तिने या खेळासाठी मला खूप प्रोत्साहन दिले आहे. माझा आहार , स्पर्धेचे नियोजन, कॉलेजचा अभ्यास यामध्ये आईचे अमूल्य योगदान आहे. भाऊ तनिष दिपक साळवे हा इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून त्याच्याकडूनही नेहमीच मार्गदर्शन मिळत आहेत परंतू या खेळामध्ये मुख्य प्रशिक्षक अमन बाबुराम वर्मा यांना माझे आदर्श मानले असून सरांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले असून वडील दिवंगत डॉ. दिपक महादेव साळवे यांच्यासह आई, भाऊ व प्रशिक्षक अमन वर्मा सर यांना हे रौप्य पदक समर्पित करत असल्याचे रोनक यांनी सांगितले.
या खेळातील माझी प्रगती पाहून जंप रोप फेडरेशन ऑफ इंडियाने मला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली. माझा जंप रोपचा सराव सध्या डोंबिवलीमध्ये रुल द रोप या कोचिंग सेंटर मध्ये सुरू आहे. या टिमचे प्रशिक्षक अमन वर्मा हे गेले काही वर्ष डोंबिवलीतील विद्यार्थ्यांंना शाळा व कॉलेज मध्ये जाऊन याचे खास प्रशिक्षण देत आहेत व यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले आहेत. वर्मा सरांचे सतत मार्गदर्शन मिळत असते. नियमितपणे सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास सराव करून 2024 मध्ये जपान येथे झालेल्या एशियन चॅम्पियन जंप रोप स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक मिळविला आणि तेव्हाच ठरवलं की पुढील आंतरराष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत पदक मिळवायचेच आणि जपान कावासाकी येथे झालेली जंप रोप चॅम्पियन 2025 या स्पर्धेत रौप्य पदक" मिळविले.
कोट; " मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर केले पाहिजे आणि जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करून भारताचे नाव मोठे केले पाहिजे . ; रोनक दिपक साळवे , रौप्य पदक विजेता
कोणताही सरकारी निधी, खाजगी प्रायोजक न घेता, स्वतःच्या खर्चाने या टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे पुढे अशीच कामगिरी करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. लोकप्रतिनिधी, सरकारी निधी व खाजगी प्रायोजक यांच्याकडून काही निधी मिळाल्यास या खेळासाठी अनेक नामवंत खेळाडू देशासाठी तयार होतील ; अमन वर्मा, प्रशिक्षक