माती आणि नाती जोडणारा कुर्ला टू वेगुर्ला चित्रपट !

प्रेक्षकांच्या भेटीला १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
मराठी चित्रपटामधून सातत्याने कोकणातल्या गोष्टी, विषय वा चित्रीकरणाच्या निमित्ताने तिथल्या संस्कृतीचं दर्शन घडलं आहे. आता पुन्हा एकदा कोकणातल्या तरुणांच्या लग्नाचा विषय घेऊन एक नवीन चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे.
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट ' कुर्ला टू वेंगुर्ला ' या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थानी "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे याचित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे.
अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे तर वितरक म्हणून पिकलइंटरटेनमेंट काम पाहणार आहे.
काही वर्षांत गावातल्या मुलांची लग्न जमणे ही एक समस्याच झाली आहे. याच संकल्पनेचा वेध "कुर्ला टू वेंगुर्ला" हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला आहे. आजच्या काळातील मुला-मुलींच्या आकांक्षा, त्यांच्या पालकांची इच्छा-अपेक्षा, गाव आणि शहरातील स्थिती असे मुद्दे मनोरंजक पद्धतीने हाताळत एक धमाल गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे घरोघरी असणारी कहाणीच आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.
कोट :
1. " निश्चितच कोकण विकासाला दिशा आणि गती देणारा हा चित्रपट प्रचंड यशस्वी व्हावा ही सर्वप्रथम जबाबदारी मालवणी कोकणी सिंधुदुर्ग मधल्या तरुणांची आहे आणि त्याकरता सर्वांनी पुढाकार घ्यावे, ज्या संस्थांना किंवा उद्योजकांना या चित्रपटाचे खास शो आयोजित करायचे आहेत त्यांनी संपर्क अनंत रिंगे 70453 74080 यांच्याशी संपर्क साधावे; संजयराव यादव, उद्योजक
2. " मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट ; कलाकार, प्रेक्षकवर्ग, कोकणातील विविध सामाजिक संस्था, तसेच सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी हे सर्वजण एकजूट होऊन या चित्रपटासाठी पुढे सरसावले आहेत.त्यामुळे आगामी काळात मराठी चित्रपटांना कोकणवासीयांचा नक्कीच भक्कम पाठिंबा मिळेल, यात शंका नाही. चला, आपण सगळ्यांनी मिळून “कुर्ला टू वेंगुर्ला” पाहूया आणि मराठी कलाविश्वाला साथ देऊया; सिद्धेश पाटील, कोकणवासीय

